Saturday, May 2, 2009

"मंदी' चल हट... (सकाळ)

जागतिक मंदीचा अमेरिकेकडून कांगावा
सकाळ वृत्तसेवा
Saturday, May 02nd, 2009 AT 2:05 PM
Tags: jalgaon, recession, lecture
Close...
जळगाव, ता. १ - जागतिक मंदी वेगवेगळ्या अंगाने भिडत राहणार असली तरी आपल्याकडे जागतिक मंदी नाही. आपल्या देशाचा विकासाचा दर सहा टक्के आहे. विकासाचा दर नऊ टक्‍क्‍यांवरून सहा-सात टक्‍क्‍यांवर येतो त्याला आपण मंदी असे म्हणतो. मुळात इतर देशांत तो वजा दोन इतका आहे, त्यामानाने भारतात आपल्याकडे मंदी नाहीच; उलट भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे.
जागतिक मंदीचा अमेरिकेकडून कांगावा केला जात आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा नॅशनल सिक्‍युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड'चे (एनएसडीएल) कार्यकारी उपाध्यक्ष चंद्रशेखर टिळक यांनी येथे केले.
"सकाळ' आणि रोटरी क्‍लब ऑफ जळगाव वेस्ट तर्फे "जागतिक मंदी आणि आपण' या विषयावर येथील मायादेवीनगरातील रोटरी हॉलमध्ये श्री. टिळक यांचे आज सायंकाळी व्याख्यान झाले. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्‍लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष अरुण नंदर्षी, शरद राठी, "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक विश्वास देवकर उपस्थित होते.
श्री. टिळक म्हणाले की, अमेरिका, युरोपात जशी मंदी आहे तसे कुठलेही वातावरण आपल्याकडे नाही. याचे कारण भारताने गेल्या सतरा- अठरा वर्षात केलेली आर्थिक प्रगतीत आहे. तरीही भारतातील अनेक कंपन्या जागतिक मंदीच्या कार्पेटखाली नोकर कपात व आपली अनेक पापे लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मंदीचा परिणाम सेवा सेक्‍टरवर तरी नक्कीच नसतो. मंदी आहे, असे आपल्याकडे भासविले जात असेल तर मग रस्त्यावर दुचाकी, चारचाकींची गर्दी का वाढते?, "नॅनो' गाडीचे साडेतीन लाखांचे बुकिंग का होते?, "म्हाडा'च्या घरांसाठी अर्जांची विक्रमी नोंदणी का होते?, बॅंका नवनवीन शाखा का उघडत आहेत ?, रेल्वेचे तीन महिन्यांपूर्वींचे आरक्षण बुकिंग तीन महिन्यानंतरही वेटींगच का राहते?, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे आपण स्वतःलाच विचारली तर जागतिक मंदी कुठे आहे?, असा प्रश्‍न साहजिकच पडेल.
तसेच मंदीचा बागुलबुवा केला जात असेल तर मग बाजारातील वस्तूंच्या किंमती स्वस्त का झाल्या नाहीत? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. सध्याच्या जागतिक मंदीत खंबीर राजकीय भूमिका घेणे अतिशय गरजेचे आहे. आर्थिक धोरणात सामंजस्य ठेवल्यास मंदी ही गुंतवणुकीसाठी संधी ठरू शकेल, असेही श्री. टिळक म्हणाले.

मंदीची झळ दीड वर्षानंतर शक्‍य
जागतिक मंदीचे सामाजिक परिणाम देशावर होत असून, दिसायला मंदी हा जरी आर्थिक घटक असला तरी राजकारणात बदल होऊ शकतात. जागतिक मंदीची चर्चा केली जाते याचा विचार करण्याची गरज आहे.
जागतिक मंदीचा भारताशी संबंध आहे, असे जर म्हटले तर मंदीत दर खाली यायला हवे, पण तसे झाले नाही. डॉलर कमी होत नाही तोपर्यंत मागणी टिकून आहे. मध्यमवर्गीयांचे राहणीमान बदलत नाही तोपर्यंत सामाजिक, आर्थिक बाबीही बदलणार नाहीत. म्हणूनच इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे तूर्त तरी मंदी नाही. मंदीचा परिणाम जाणवण्यास साधारणतः एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल.
मात्र, तोपर्यंतचा काळ हातात असल्याने मंदीवर मात करण्यासाठी धोरणे राबवायला हवी. मंदीच्या भीतीने हात गाळून बसण्यापेक्षा हातात आहे त्या संधीचे सोने करायला हवे, असेही ते म्हणाले.
शेअर बाजारात कधी नव्हे एवढे चढ-उतारच अचानक येतात. याचा अर्थ जागतिक मंदी असा नव्हे, असे सांगून श्री. टिळक म्हणाले, ""सध्या ऑईलची मागणी कमी झालेली नाही. १८ भारतीय कंपन्यांनी ११८ अमेरिकन कंपन्यांशी पूर्ण डॉलरचा मोबदला देऊन करार केला आहे.
या बाबी मंदी नसल्याचे द्योतक आहेत. समाजव्यवस्थेमध्ये लिक्विडिटी आणि प्रॉफिटॅबिलिटी या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. मात्र या दोन्ही गोष्टी स्वतंत्र आहेत, ही बाब ध्यानात घ्यावी लागेल. सध्याच्या स्थितीचा आपण सक्षम देश म्हणून योग्य उपयोग केला, तर येत्या २०२० पर्यंत महासत्ता बनण्याचा हक्क आपल्याला आहे, असे सांगून त्यांनी १९२९ ची आर्थिक मंदी आणि आताची स्थिती यातील फरक विविध उदाहरणांसह स्पष्ट केला.

दहशतवादाचा परिणाम अमेरिकेत मंदी
जागतिक मंदी आणि दहशतवाद हे एकमेकांशी निगडित आहे. दहशतवाद हा सामाजिक असला तरी अमेरिकेतील मंदी हे त्याचे परिणाम आहे. प्रसारमाध्यमे आणि विचारवंत यांनी विचार न करताच यावर चर्चा केल्या आहेत. अमेरिकेला आर्थिक दृष्टिकोनातून भीती वाटते. युद्ध ही अमेरिकेची आर्थिक व सामाजिक गरज आहे.
अमेरिकेसारखा देश व्हिएतनामशी युद्ध करतो, म्हणजेच यातून भारताला दहशत मिळाली पाहिजे, असा अर्थ आहे. मुंबईवर झालेला २६ नोव्हेंबर २००८ चा दहशतवादी हल्ल्यामागे भारताची आर्थिक विकासात होणारी प्रगती हेच यामागील कारण होते, असे टिळक म्हणाले. शेवटी त्यांनी जागतिक मंदीशी निगडित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे दिली.
रोटरी क्‍लब ऑफ जळगाव वेस्टचे माजी अध्यश्र गनी मेमन यांनी सूत्रसंचालन केले व व्याख्यानाच्या विषयामागची पार्श्‍वभूमी विशद केली. कार्यक्रमाचे प्रायोजक दी वसंतस्‌ सुपरशॉपचे संचालक तथा रोटरीचे प्रकल्प संचालक नितीन रेदासनी यांनी प्रमुख वक्ते अर्थतज्ज्ञ टिळक यांचा परिचय करून दिला. "सकाळ' च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्री. देवकर यांनी प्रास्ताविक केले.
"मंदी' चल हट..
भारताचा विकासदर वाढता आहे. दरडोई उत्पन्न वाढले आहे. गुंतवणुकीपेक्षा बचतीचा दर जास्त असलेला जगातील एकमेव देश म्हणून भारताचे नाव अग्रक्रमावर आहे. आजही आपल्याकडे गुंतवणुकीसाठी पैसा आहे. त्यामुळे भारतावर जागतिक मंदीला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. "मंदी' चल हट.. असेच काहीसे भारतातील वातावरण आहे, असेही श्री. टिळक म्हणाले.